Monday, November 14, 2011

Anna Hajare Effect दि अण्णा इफेक्ट.....

Anna Hajare Effect दि अण्णा इफेक्ट.....

धोंडोपंत आपटे दि अण्णा इफेक्ट.....
वेळ रविवार दुपार. स्थळ वडाळा स्टेशन ते किंग्ज सर्कल हा रस्ता. रस्त्यावर काहीही ट्रॅफिक नाही. वडाळा स्टेशनला लेफ्ट घेऊन किंग्ज सर्कलच्या रस्याला लागलो. तिथे एक फ्लाय ओव्हर आहे. त्याखाली पहिला सिग्नल. सिग्नल लाल पडलेला. आमच्या मागे पुढे एकही गाडी नाही. लाल सिग्नल पाहिल्यावर पाय ऍक्सिलेटर वरून क्लच ब्रेक वर आले, गिअर बदलला. स्पीड कमी करत सिग्नलशी आलो. आजूबाजूला कुणीही नव्हतं. पुन्हा ऍक्सिलेटर, गाडीने वेग घेतला. पुन्हा गिअर बदलणार तोच समोर हवालदार अर्ध्या रस्त्यात उभा. गाडी बाजूला घ्या ची खूण करत. मनात म्हटलं, "चला, याची क्वार्टर सुटली."


गाडी बाजूला लावली. तो पर्यंत हवालदार गाडीजवळ. म्हटलं, " नमस्कार, बोला."


" काही नाही लायसन्स काढा." लायसन्स काढलं. लायसन्स वरचे नाव वाचत त्याने गाडीत डोकावलं. स्वामींचा फोटो. नंबर प्लेट बघायला मागे गेला. मागच्या काचेवर ॥ श्री स्वामी समर्थ॥


आम्ही खाली उतरलो. तोपर्यंत त्याने लायसन्सवरील नाव, पत्ता वाचला होता. हवालदार म्हणाला, " तुम्ही सरळ सरळ सिग्नल तोडून येताय. काय बोलायचं तुम्हांला ?"


म्हटलं, " होय, चूक झाली. मान्य करतो. मी हे नाही म्हणत की सिग्नल तोडला नाहीये. कोण नव्हतं रस्त्यात. म्हटलं पटकन निघून जाऊ. पण आपली भेट आज ठरली होती."


" तुम्ही ड्रायव्हिंग करतांना सीटबेल्ट लावलेला नाही. (अथर्वकडे हात दाखवून) तुमचा मुलगा बेल्ट लावून बसलाय. तुम्ही बेल्ट न लावता गाडी चालवताय. तुमच्यासारखी सुसंस्कृत माणसं असं करायला लागली तर काय बोलणार?"


"खरं आहे तुम्ही म्हणताय ते. पण काय आहे की, आपण जुन्या वळणाचे लोक. सीटबेल्ट लावला म्हणजे म्हशीच्या गळ्यात लोढणं बांधल्यासारखं वाटतं. काही सवयी लागलेत. पायात चपला न घालता गाडी चालवायची, खिडकीत हात ठेऊन ड्रायव्हिंग करायचं. मग आता काय करायचं पुढे?"


"काही नाही. रिसिट फाडायची, लायसन्स जमा करायचं. उद्या किंग्जसर्कल चौकीत यायचं, दंड भरायचा आणि लायसन्स घेऊन जायचं."


तो म्हणतोय ते खरोखर की नुसताच वरवरचं बोलतोय हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक खडा टाकला. म्हटलं, " इथे काही आपली सेटलमेंट नाही होणार का?"


त्यावर तो जे बोललाय, ते लाखमोलाचं वाक्य होतं. तो म्हणाला,

"अहो ते सेटलमेंटचे वगैरे दिवस गेले आता. अण्णा बघा स्वत:च्या जिवाचे हाल करून उपोषण करतायतं."

आमच्या तोंडून उस्फूर्तपणे उद्गार निघाला. म्हटलं,

" क्या बात है साहेब !!!! तुमचं हे वाक्य मला इतकं भावलाय की मी शंभर काय पाचशे रुपये दंड भरायला पण तयार आहे."


तो म्हणाला, " तुम्ही मराठी आहात म्हणून मी तुम्हाला सीटबेल्टचा फाईन लावत नाही. पण सिग्नल तोडल्याचा भरावा लागेल."


असे म्हणत त्याने रिसीट बनवली. आमच्यासाठी तो अत्यंत आनंदाचा क्षण होता.


अण्णांसारखा एक माणूस समाजाची मानसिकता बदलू शकतो, याहून मोठा चमत्कार तो काय असू शकतो?


अण्णांना आमचे विनम्र दंडवत आणि त्या हवालदाराला आमच्या शुभेच्छा.


आपला, (संतुष्ट) धोंडोपंत
http://www.facebook.com/shriwani/posts/284776181563366

No comments:

Post a Comment