Tuesday, April 13, 2010

Adgalichya Kholi Madhale Daptar - अडगळीच्या खोलीमधलं दप्तर


अडगळीच्या खोलीमधलं
दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||


प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा
समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||

Source शिवाजी शिंदे ह्याच्या कडून Email ala hota
Source Unknow









No comments:

Post a Comment