पाऊस पहिला बरसून गेला..
ढगांच्या तालावर, बिजलीला नाचवून गेला..
पाऊस पहिला बरसून गेला..
अतृप्त धरणीला भिजण्याचे वेड देऊन गेला...
पाऊस पहिला बरसून गेला...
उजाड माळरानावर बीजांकूर रुजवून गेला...
पाऊस पहिला बरसून गेला..
न्हालेल्या सृष्टीला नवा साज चढवून गेला...
पाऊस पहिला बरसून गेला..
निष्पर्ण मनाला पालवीची आस लावून गेला...
पाऊस पहिला बरसून गेला..
________________________________________________________________

___________________________________________________________________________
पहिला पाऊस पडतो
तेव्हा एकच काम करायचं,
हातातली काम टाकून देऊन
पावसात जाऊन भिजायचं...
आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणाऱ्या धारा,
श्वासामध्ये भरून घ्यायचा
सळसळणारा वारा...
कानामध्ये साठवून घ्यायचे
गडगडणारे मेघ,
डोळ्यामध्ये भरून घ्यायची
सौदामिनीची रेघ...
पावसाबरोबर पाऊस
बनून नाचनाचायचं,
अंगणामध्ये तळं
होऊन साचायचं...
आपलं असलं वागणं
बघून लोक आपल्याला हसतील,

आपला स्क्रू ढिला झालाय
असंसुद्धा म्हणतील...
ज्यांना हसायचंय त्यांना हसू देत
काय म्हणायचंय ते म्हणू देत,

त्यांच्या दु:खाच्या पावसामध्ये
त्याचं त्यांना कण्हू दे...
असल्या चिल्लर गोष्टीकडे
आपण दुर्लक्ष करायचं,
पहिला पाऊस एकदाच
येतो हे लक्षात ठेवायचं...
पाऊस पहिला बरसून गेला...
म्हणून...
हातातली काम टाकून
पावसात जाऊन भिजायचं...

No comments:
Post a Comment