आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.
अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन् मृदुलाला मी कळवलंच ः "येतो येत्या शनिवारी जेवायला.'
त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं "जेवायला येतोय' म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.
तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, "तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल "प्रीफर' कराल? "स्वीकार' गार्डन रेस्टॉरंट आहे, "अतिथी'तलं फूड मस्तच!, "सुरभि'मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा...'
संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.
"हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.'
"अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?'
तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, "अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.'
श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, "वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!'
चला! मी सुटकेचा निःश्वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क "घरचं' जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं - मनापासूनचं!
ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : "हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस...'
फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली!
श्रीकांत म्हणाला, ""आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या "सागर'मधलं फूड बाकी...'
दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न् खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त "पार्सल'चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही "व्वा!' म्हणावं तर लगोलग उत्तर येतं - "हे श्रेय माझं नाही. "अन्नपूर्णा'तून आणलंय!'
दिवस "पार्सल'नं सुरू होतो; "पार्सल'नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून "चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी' पार्सल, तर रात्री घरी जाताना "आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!'
आजारपण, वार्धक्य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं "रेडीमेड पार्सल' आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!
घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल...पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!
कुणी म्हणेल ः सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न् हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून "घरी' जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन् बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.
जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न् घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद् वेळची "सोय' जर "कायमची व्यवस्था' होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.
आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!
आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न् समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.
आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर "शब्द'सुद्धा "पार्सल'मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत.
श्रीकांत न् मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं "मन' व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!
दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून "पार्सल'ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा "माझ्यासाठी' केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!